परभणी (प्रतिनिधी) शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मंगळवारी अभाविपचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शहरात महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणी शाखेचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा यशस्वीपणे पार पडला. विविध आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा केवळ निदर्शन नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाला जागे करण्याची ठाम आणि तीव्र हाक होती.

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी बॅनर-फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. “उठ दोस्ता उगार मुठ… तूच थांबव तुझ्या शिक्षणाची लूट!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात अभाविपने राज्यातील २२ प्रमुख शैक्षणिक समस्या मांडल्या.
यावेळी म्हणण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे व सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क तात्काळ कमी करावे; विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाची घोषणा प्रत्यक्षात अमलात आणावी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील परीक्षा व निकालातील गोंधळ तात्काळ थांबवून वेळेवर गुणपत्रिका द्याव्यात; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पदे भरावीत, परीक्षा शुल्क कमी करावे व इंटर्न्स/रेसिडेंट डॉक्टर्स यांना स्टायपेंड वाढवावे; प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतन व निर्वाह भत्ता तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत; शासकीय वसतिगृहे, आयटीआय इमारती व उपकरणांचे नूतनीकरण करावे; MH-CET साठी CUET धर्तीवर एकच अर्ज प्रक्रिया, कमी शुल्क व सुलभ प्रणाली लागू करावी; महाविद्यालयीन खुल्या निवडणुका तात्काळ सुरू कराव्यात; मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता वाढवावी; ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावा; आयटीआय निर्वाह भत्ता त्वरित सुरू करावा; पशुवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अंतनिर्वाह भत्ता व अधिछात्रवृत्ती लागू करावी; परभणी येथे शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, परभणी येथे स्वतंत्र जागा व इमारत उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे; परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत तात्काळ पूर्ण करून सुरू करावी; तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरावीत आदींचा समावेश होता

अभाविपने राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन शांततेत मागण्या मांडल्या असल्याचे नमूद केले. मात्र शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर विविध जिल्ह्यांत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे म्हणाले की, राज्यातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. परीक्षा शुल्कवाढ, शिष्यवृत्तीतील विलंब, रिक्त पदांमुळे गुणवत्तेवर होणारा परिणाम, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणी यामुळे शिक्षणव्यवस्था कमकुवत होत आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ घोषणांच्या माध्यमातून पाहू नये, तर ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा अभाविप राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारेल.
परभणी शहरमंत्री कु. सेजल काळे म्हणाल्या की, सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसून येत नाही. विद्यार्थिनींचे मोफत शिक्षण असो वा आयटीआयचे विद्यावेतन, आम्हाला केवळ कागदोपत्री आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी आहे अशी मागणी केली
मोर्चाची यशस्वी करण्यासाठी देवगिरीप्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, शहर मंत्री सेजल काळे जिल्हा संयोजक मुक्तेश भंडारे , आंदोलन जिल्हाप्रमुख दर्शन देशमुख
शहर सहमंत्री गायत्री लाड, प्रसाद शहाणे, पवन निकम,गौरव रेंगे
जयदेव देशमुख,वासुदेव सोनेकर आदींनी परिश्रम घेतले


