नवी दिल्लीत करण्यात आला गौरवपूर्ण सन्मान
परभणी, (प्रतिनिधी) : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल (U.S. India SME Council) तर्फे प्रदान करण्यात येणारा आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर (Outstanding Visionary Leader & True Changemaker) हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज (दि. २५ मार्च २०२६) आयोजित भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या समारंभास अमेरिकेतील मेरीलँड राज्याचे काउंटी एक्झिक्युटिव्ह मार्क अर्लिख, आंध्र प्रदेशचे एमएसएमई (MSME) व एनआरआय (NRI) रिलेशन्स मंत्री कोंडापल्ली श्रीनिवास, यूएस इंडिया एसएमई कौन्सिलचे चेअरमन सुधाकर गंधे, सीईओ एलिझा पुलिवार्थी तसेच नीरज खैरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत आणि अमेरिकेतील अनेक उद्योजकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यासह ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे. महिला उद्योजकांना चालना देणे, ‘लखपती दीदी’ योजना, ‘सिल्क अँड मिल्क’ उपक्रम आणि एकल महिला सशक्तीकरण अभियान यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला आहे.
अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेली यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना चालना देणे, नाविन्यपूर्ण उद्योजकता वाढवणे तसेच ऊर्जा, पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक विकासाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, हा सन्मान राज्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
०००००००


