परभणी (प्रतिनिधी) तालुक्यातील दामपुरी येथून घरासमोर उभी असलेली ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दत्ता रामराव काचोळे यांच्या फिर्यादीवरून दैठणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता रामराव काचोळे (वय ३६, रा. दामपुरी, ता. जि. परभणी) हे गाडी चालकाचे काम करतात. त्यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्र. MH 24 AB-7716, चेसिस क्र. MA1ZN2GHKG1A13829, इंजिन क्र. GHF1M94933) ही त्यांनी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दामपुरी येथील घरासमोर लावली होती. रात्री जेवण करून ते झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता उठून पाहिले असता, घरासमोर लावलेली बोलेरो पिकअप जागेवर दिसून आली नाही. १९ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही पिकअप चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. फिर्यादी यांनी आजूबाजूचा परिसर तसेच गावात व इतरत्र शोध घेतला असता वाहन आढळून आले नाही.
चोरीला गेलेल्या वाहनाची किंमत ५ लाख रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. याप्रकरणी काचोळे यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी दैठणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


