परभणी (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने शनिवार 21 नोव्हेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यांत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी एकूण 32 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यातून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
या विशेष लोकअदालतीत धनादेश अनादराशी संबंधित प्रकरणांवर तडजोडीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला. विशेष ड्राइव्हअंतर्गत एकूण 32 प्रकरणे निकाली काढून संबंधित पक्षकारांमध्ये तडजोड घडवून आणण्यात आली.
ही विशेष लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परभणीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हिंगोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एल. आणेकर यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात आले. परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील कार्यरत सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस.टी. अडकिने तसेच दोन्ही जिल्ह्यांतील वकील संघाच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्या सर्वांचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण म. काळे यांनी आभार मानले.


