परभणी (प्रतिनिधी) खटल्यातील साक्षीदारास न्यायालयात साक्ष न देण्यासाठी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परभणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शेख सलीम शेख जिलानी (वय ५७, रा. रमाबाई नगर, परभणी) याला दोषी ठरवून ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एम. सदराणी यांनी हा निकाल दिला.
फिर्यादी शेख लुकमान शेख महेबुब रा. रमाबाई नगर परभणी यांनी २९ जानेवारी २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते कामावरून परतल्यानंतर गंगाखेड नाका येथे चहा पिण्यासाठी गेले होते. त्या वेळी फिर्यादीचा मित्र सोहेल याचा खून केलेल्या प्रकरणातील आरोपी शेख समी याचे वडील शेख सलीम शेख जिलानी तेथे भेटले. तू माझ्या मुलाच्या खटल्यात साक्षीदार असून, उद्या न्यायालयात मुलाविरुद्ध साक्ष दिल्यास तुलाही सोहेलसारखे मारून टाकीन, अशी धमकी देत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.
या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८/२०२० अन्वये भारतीय दंड संहितेच्या (भादवि) कलम १९५(अ), ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोह/१० बी. टी. मुलगीर यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले असून, त्यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. अखेरीस न्यायालयाने आरोपीस भादवि कलम १९५(अ) अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. मयूर साळापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. आनंद गिराम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि सुरेश चव्हाण, मपोह/६५० वंदना आदोडे (टीएमसी), मपोह/१३०२ शेख रिजवाना आणि पोह/७९६ सय्यद रहीम यांनी कामकाज पाहिले.


