परभणी, (प्रतिनिधी) परभणी शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील शिवशक्ती परिसरात मंत्री मंगल कार्यालयाजवळ निर्माण झालेली मोठी कचराकुंडी बंद करून त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी परिसरात आकर्षक रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

महापौर सय्यद इकबाल व महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून, उपमहापौर गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल (तात्या) सरोदे, सन्माननीय सदस्य मीनाताई वरपूडकर, आजेगावकर, गणेश उर्फ बबलू टाक, रितेश झांबड, उपायुक्त तुकाराम कदम तसेच विभागप्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर कचराकुंडी स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने व त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बंद करण्यात आली. कचराकुंडी बंद केल्यानंतर त्या परिसराची स्वच्छता करून रांगोळीच्या माध्यमातून जागेचे सुशोभीकरण करण्यात आले.
आपले शहर, आपला प्रभाग आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. परभणीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेविषयी जाणीव व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. नागरिकांनी सहकार्य केल्यास परभणी शहर निश्चितच स्वच्छ व सुंदर होईल, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.यावेळी महानगरपालिकेचे शहर समन्वयक तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, मुकादम पुरभाजी उबाळे, जय मकरंद, मिलिंद उबाळे, तुषार उबाळे तसेच महिला कर्मचारी उपस्थित होते.


