परभणी (प्रतिनिधी) दीर्घकाळ प्रतिक्षेत परभणीतील नाट्यकर्मी, कलावंतांसाठी लवकर पुण्यात मुंबईच्या धर्तीवर सुसज्ज नवीन रंगमंदिरासाठी शासनाकडून निधी मंजूर करुन घेतला आहे. आता कलाकारांची अडचण दूर होईल असे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी आज येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त गुरुवार दि. ५ रोजी नटराज पूजनाच्या वेळी केले. यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, जेष्ठ नाट्यकर्मी रविशंकर झिंगरे यांच्यासह शहरातील नाट्यकलावंताची उपस्थिती होती.

हा कार्यक्रम येथील बालरंगभूमी जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराजाच्या मूर्तीचे पूजन का. संजय जाधव यांच्या हस्ते झाले.
यावेळी पुढे बोलताना खा. जाधव म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून शहरात एका सुसज्ज नाट्यगृहाची कमतरता सहन करत कलावंत आपली कला जोपासत आहेत. ती अडचण लवकरच दूर होईल. विद्यमान सरकारने पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी नवीन रंगमंदिराच्या बांधकामासाठी दिला आहे. त्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देखील तेवढाच निधी मिळणार आहे. नवीन रंगमंदिर पूर्वीच्या नटराज रंगमंदिराच्या जागेवरच होणार असून ते व्यापारी काॅम्प्लेक्स व पार्कींगसह तीन मजली ,सर्व सुविधांनी युक्त बांधण्यात येईल. यासाठी रंगकर्मींनींही सूचना सूचवाव्या असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आपल्या काळात केवळ ९ कोटीत रंगमंदिर पुनर्निर्माण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला होता, मात्र काही विरोधकांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने तो पूर्णत्वास गेला नाही, असे सांगून आता आपण देखील या नवीन रंगमंदिर उभारणीसाठी संपूर्ण शक्ती निधी सहकार्य करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी बालरंगभूमीचे अध्यक्ष, आबा ढोले, उपाध्यक्ष नितीन लोहट, कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर, कार्यवाह त्र्यंबक वडसकर, सदस्य , किशोर विश्वामित्रे, प्रमोद बल्लाळ, अजय डिघोळकर, संजय पांडे, मधुकर उमरीकर, मनिषा उमरीकर , दिनकर देशपांडे, प्रकाश बारबिंड, शंकर आजेगावकर , रवि पुराणिक , बालाजी दामुके, रामदास कदम, राजेश चव्हाण, संजय पाटील, शिवाजी. सुक्ते, नंदा कुलकर्णी, वर्षा जोशी, अनघा दुधगावकर , प्रतिक ढोले, सुरेश हिवाळे, हभप लक्ष्मण मोरे, राजेश शहा, श्रीकांत कुलकर्णी, रुस्तुम नरवाडे, शिरसकर आदी रंगकर्मी, कलावंतांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेंद्र दुधगावकर यांनी तर, सूत्रसंचालन दिनकर देशपांडे यांनी केले.


