मानवत(प्रतिनिधी) : काळानुसार समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलते. त्याचा परिणाम प्रत्येक पिढीच्या विचारांवर, जीवनशैलीवर आणि दृष्टिकोनावर होत असतो. मात्र, बदलत्या काळाचा स्वीकार करताना राष्ट्रभावना, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांची जपणूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना रुजली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले.
मानवत येथील देवी मंदिर सभागृहात मंगळवारी (ता. २७) आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ‘बदलती पिढी, बदलता देश’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरयू खेकाळे होत्या.
डॉ. नाईक यांनी जागतिक इतिहासातील विविध कालखंडांतील सांस्कृतिक बदलांचा आढावा घेत पिढ्यांमधील स्थित्यंतर स्पष्ट केले. साधारणतः दोन पिढ्यांमधील अंतर २० ते ३० वर्षांचे असते. त्या त्या काळातील आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक परिस्थितीनुसार पिढ्यांची विचारपद्धती व जीवनशैली आकार घेत असते. ‘सायलेंट जनरेशन’पासून एक्स, वाय, झेड आणि ‘जनरेशन अल्फा’पर्यंतचा प्रवास त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केला.
जागतिक स्तरावर घडणाऱ्या सामाजिक व आर्थिक बदलांचा नव्या पिढीवर मोठा प्रभाव पडत आहे. पिढ्यांमधील बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी संस्कृतीचा मूलाधार कायम राहणे महत्त्वाचे आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना तर्कशुद्ध, विवेकी आणि सुजाण नागरिक घडविण्यासाठी सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व विशद करताना त्यांनी जपान, इटली, भारत तसेच इस्रायलमधील ऐतिहासिक घटनांचा संदर्भ दिला. विविध ऐतिहासिक व्यक्ती, चळवळी आणि घटनांच्या माध्यमातून राष्ट्रभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या सामाजिक वास्तवात राष्ट्रहिताची जाणीव आणि सांस्कृतिक मूल्ये जपली गेली पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मिटकरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शोभा कुलकर्णी, डॉ. नीरज दगडू, डॉ. रविराज बारहाते, शशिकांत नेवरेकर आणि उदयकुमार जैन यांनी प्रयत्न केले.


