परभणी,(प्रतिनिधी) : गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे वझूर शिवारात अत्याधुनिक यंत्रणांच्याद्वारे वाळूचा बेकायदेशीरपणे बेसुमार उपसा करणार्या माफियांविरुध्द नांदेड येथील पोलिस उपमहानिरीक्षकांच्या एका पथकाने कारवाई केली व सुमारे 80 लाखांची साधनसामुग्री व वाळू जप्त केली.

मौजे वझूर शिवारात गुरुवार 29 ऑक्टोंबर रोजी इंजिन बोटच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा होत असल्याचे व सदर वाळू तराफ्याच्या सहाय्याने नदी किनारी आणली जात असल्याचे कळाल्याबरोबर उपमहानिरीक्षकांच्या या पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली व वाळूने भरलेले चार तराफे, एक हायवा, एक टिप्पर, जेसीबी मशीन व नदीपात्रातून बाहेर काढलेली तीस ब्रास वाळू असा एकूण 79 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे, गजानन डवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, अवैध व्यवसायांबाबत थेट पोलिसांना नागरीकांनी माहिती पोहोचवावी, त्यासाठी 9150100100 या मोबाईल क्रमांकाचा वापर करावा, खबर नावाची ही हेल्पलाईन नागरीकांसाठी उपलब्ध आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.


