· दि.30 नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविणार
परभणी, (प्रतिनिधी): जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे, जलसंधारणाला चालना देणे आणि नैसर्गिक व शाश्वत शेतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वतीने देशभरात उद्या गुरुवार, दि.22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘शेती वाचवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात कृषी विभाग, आत्मा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि कृषी विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती, प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अभियानाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमार्फत गावपातळीवर जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण व पाण्याची साठवणूक याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच माती परीक्षणावर आधारित पीक पोषण व्यवस्थापन, मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, खत विक्रीविषयक नियमांची माहिती आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
शेतीतील कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा योग्य व संतुलित वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. प्रशिक्षण, प्रक्षेत्र भेटी आणि शेतावरील प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक, सेंद्रिय व शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्यात येणार आहे.
शेतकरी ओळखपत्र व महिला शेतकरी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन
या अभियानांतर्गत शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करणे आणि त्यातील माहिती अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच महिला सक्षमीकरणाशी संबंधित तरतुदींच्या अनुषंगाने महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याबाबतही क्षेत्रीय स्तरावर माहिती देण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गावपातळीवर प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षण वर्ग, शेतकरी मेळावे व इतर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या अभियानांतर्गत आयोजित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे व जनजागृती कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी केले आहे.

*****


