स्वतःच्या निवासस्थानी व शेतात जलतारा शोषखड्डे तयार करून लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करा*
परभणी, (प्रतिनिधी)– भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती आणि जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या निवासस्थानी तसेच स्वतःच्या शेतात प्राधान्याने जलतारा शोषखड्डे तयार करावेत आणि या कामाचे छायाचित्र (सेल्फी) काढून जनजागृतीसाठी प्रसारित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे यासाठी जलतारा शोषखड्डे उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येकाने आपल्या परिसरात उपलब्ध जागा आणि भौगोलिक परिस्थितीनुसार जलपुनर्भरणाचे उपाय अवलंबल्यास जलसंधारणाच्या प्रयत्नांना व्यापक लोकसहभाग मिळू शकतो.
शासकीय अधिकारी व कर्मचारी हे समाजासाठी आदर्श निर्माण करणारे घटक आहेत. त्यांनी स्वतःच्या कृतीतून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केल्यास सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांनाही यासाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जलतारा शोषखड्ड्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करून त्यासोबतची छायाचित्रे प्रसारित करावीत आणि आपल्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये जलपुनर्भरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी यांनी नमूद केले.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, आज केलेले जलपुनर्भरणाचे प्रयत्न उद्याच्या पाणी सुरक्षेसाठी मोलाचे ठरणार आहेत. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जिल्ह्यात जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
***


