परभणी, (प्रतिनिधी): अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेअंतर्गत स्पॉट अॅडमिशनच्या तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या 19 ऑक्टोबर 2026 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी उद्या मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी निर्धारित मुदतीत नोंदणी व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या https://hmasnew.mahait.org या पोर्टलच्या सर्व्हरच्या दुरुस्ती व अद्ययावतीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पोर्टल तीन दिवस बंद होते. त्यामुळे स्पॉट अॅडमिशनच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. स्पॉट अॅडमिशन नोंदणीची अंतिम मुदत ही 20 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली असून, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी 19 ते 23 ऑक्टोबर 2026च्या रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. त्यानंतर ऑनलाइन प्राप्त अर्जांची छाननी ही 19 ते 30 ऑक्टोबर 2026 रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
स्पॉट अॅडमिशनमध्ये नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित शासकीय वसतिगृहात जमा करावी. पोर्टल सुरू झाल्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी संगणकाच्या कीबोर्डवरील Ctrl + F5 ही कळ दाबून पेज रिफ्रेश करावे, जेणेकरून पोर्टलवरील नवीन अद्ययावत माहिती दिसेल.
स्पॉट अॅडमिशनसाठी अद्याप नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश इच्छुक शासकीय वसतिगृहाच्या संबंधित गृहपालांशी किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे 20 ऑक्टोबरपूर्वी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश क्षमता अपुरी असल्यामुळे वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही, तर आयुक्तालयाच्या निर्देशानुसार त्यांचे अर्ज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी वर्ग करण्यात येतील. मात्र, वसतिगृहात मिळालेला प्रवेश स्वतःहून रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शासकीय वसतिगृहासाठीचा अर्ज विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे.
स्पॉट अॅडमिशनसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे.

*-*-*-*-*-


