परभणी,(प्रतिनिधी) : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘सुरक्षित अन्न-निरोगी महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत भेसळीच्या संशयावरून सुमारे 13 लाख 4 हजार 400 रुपये किमतीचा 4,348 किलो हळद पावडर साठा जप्त करण्यात आला असून, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या परभणी पथकाने सेलू-वालूर रोडवरील ब्रम्हणगाव येथील मे. अभिनव फूड प्रॉडक्ट्स या पेढीवर छापा टाकला. या ठिकाणी खाद्यरंग भेसळ असल्याच्या संशयावरून, तसेच अनारोग्यकारक हाताळणी व अयोग्य पॅकिंग आढळल्याने 13 लाख रुपयांचा हळद साठा जप्त करण्यात आला. या पेढीमध्ये अन्न सुरक्षा व मानदे नियमन, 2011 च्या परिशिष्ट-4 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने संस्थेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जप्त केलेल्या हळदीचे नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर न्यायालयात खटला भरला जाणार आहे.
दुसर्या कारवाईत, परभणी शहरातील रहेमत नगर येथील मे. के. के. बेकर्स या पेढीची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी एफएसएसएआय परवाना अद्ययावत न करणे, कामगारांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, अॅप्रन व हेडगियरचा वापर न करणे, आस्थापनेत अस्वच्छता, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि सुरक्षित अन्नपदार्थ तयार करण्यासाठी अपुरी व्यवस्था आढळल्याने या बेकरीचा परवाना देखील तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला.
ही धाडसी कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ठोंबरे व मुळे तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) अनंत चौधरी यांच्या पथकाने सहआयुक्त (छत्रपती संभाजीनगर विभाग) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणार्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा या वेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
Friday, October 23
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत 61.81 टक्के मतदान :26 हजार 684 मतदारांपैकी 16 हजार 482 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; उपजिल्हाधिकार्यांची माहिती
- अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सेलूतील अभिनव फूड प्रॉडक्ट्स आणि परभणीतील के. के. बेकर्सचा परवाना निलंबित
- लग्नास नकार देणार्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करणार्या आरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
- लातूरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या धाडी; 18 इसमांविरुद्ध कारवाई, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त
- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अॅड. माधवराव भोसले यांच्याकडून लाख रुपयांची मदत
- जलपुनर्भरणासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
- आधार प्रमाणीकरणासाठी चौथी यादी प्रसिद्ध; २ हजार ९८६ शेतकऱ्यांचा समावेश; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश


