परभणी,(प्रतिनिधी) : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजताच्या नोंदीनुसार स्थिर आहे. येलदरी धरणात 61.05 टक्के, तर सिद्धेश्वर धरणात 29.63 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे.
येलदरी धरणात 494.391 दलघमी जिवंत पाणीसाठा असून, मृतसाठ्यासह एकूण पाणीसाठा 619.061 दलघमी आहे. धरणाची पाणीपातळी 458.400 मीटरवर आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 934.440 दलघमी आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण परिसरात आतापर्यंत 600 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विद्युत निर्मिती केंद्रातून तसेच मुख्य दरवाजांतून कोणताही विसर्ग सुरू नाही. धरणाची इशारा पातळी 461.772 मीटर, तर धोका पातळी 462.380 मीटर आहे.
दुसरीकडे, सिद्धेश्वर धरणात 23.985 दलघमी जिवंत पाणीसाठा असून, मृतसाठ्यासह एकूण पाणीसाठा 193.875 दलघमी आहे. धरणाची पाणीपातळी 411.145 मीटरवर असून, एकूण साठवण क्षमता 250.85 दलघमी आहे. यंदा धरण परिसरात आतापर्यंत 605 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच दिवशी 1,000 मिलिमीटर पावसाची नोंद होती. सिद्धेश्वर धरणाच्या मुख्य दरवाजांतून तसेच विनाद्वार सांडव्यातून कोणताही विसर्ग सुरू नाही. धरणाची इशारा पातळी 413.005 मीटर, तर धोका पातळी 414.830 मीटर आहे.
दोन्ही धरणांच्या परिसरात सध्या पावसाची नोंद नसल्याने आणि पाण्याची आवक थांबल्याने उपलब्ध जलसाठ्याचे महत्त्व वाढले आहे. आगामी काळात पाण्याचा वापर आणि उपलब्ध साठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.


