परभणी, (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत परभणी जिल्ह्यातील २९ हजार ५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी सदर योजना जाहीर केली. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर परभणी जिल्ह्यातील बँकांनी एकूण १ लाख ६० हजार ७६९ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे.
या माहितीच्या संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत ७९ हजार ८५५ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत २४ हजार ३७४ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. आता १३ ऑक्टोबर २०२६ रोजी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात आणखी २९ हजार ५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरणासाठी तीनही याद्यांमधील शेतकऱ्यांची संख्या विचारात घेता, एकूण १ लाख ३३ हजार ८२३ शेतकरी संख्या आहे.
*आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करा*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यामुळे यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
****


