परभणी, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रीगर -1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नऊ तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच पशुधनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्यात येणार आहे. साडेसात अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यावरील क्षमतेच्या कृषी पंपांनाही शासन निर्णयानुसार सवलत लागू राहणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा देताना परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये आवश्यक ती शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जलसंधारणाची कामे सुरू करण्यावरही भर देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी, शेतमजूर आदींना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी व पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करणे याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्त नऊ तालुक्यांमध्ये शासनाने लागू केलेल्या सर्व सवलती व उपाययोजनांचा लाभ संबंधित पात्र खातेदारांना मिळेल, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.
*-*-*-*-*-


