परभणी (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य रामराव वडकुते यांचे आज रविवारी पहाटे नवी दिल्लीत एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षाचे होते.
खा. वडकूते हे चार दिवसांपूर्वीच काही कामानिमित्त लखनौला गेले होते.तेथून ते परवा रात्री नवी दिल्लीत परतले. दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामी असताना राञी दम लागू लागल्याने ते अस्वस्थ झाले. अन् काल शनिवारी सकाळी ते मित्रासह नवी दिल्लीतील एम्स या नामांकित रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वडकुते यांची प्रकृती स्थिर होती. परंतु काल रात्री उशिरा उपचार सुरू असताना प्रकृती बिघडली . तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. परंतु त्यांचे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे निधन झाले. काही वर्षांपूर्वीच खासदार वडकुते यांची बायपास झाली होती.
दरम्यान हिंगोलीत कुटुंबीयांना निधनाचे वृत्त कळाल्यानंतर मोठा धक्का बसला.तत्पूर्वीच त्यांचे बंधू दिलीपराव वडकुते व अन्य काही मित्र हे काल रात्री नऊ वाजता ते रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त कळल्यानंतर तातडीने दिल्लीत दाखल झाले होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केलेल्या वडकुते यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत ते पराभूत झाले खरे परंतु वडकुते यांनी लक्षणीय मते मिळवली होती. त्या बाबीसह त्यांच्यातील धडाडीपणाची पक्षाने दखल घेतली. अन् महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केली. राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या या महामंडळाच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून वडकुते यांनी चांगली कामगिरी बजावली. त्यांना पक्षाने पुढे विधान परिषद सदस्यपद बहाल केले. परंतु विधान परिषद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वडकुते यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.या पक्षाने वडकुते यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पुढे विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी म्हणून ते कमालीचे उत्सुक असतांना वडकुते यांची भारतीय जनता पार्टीने गेल्या काही महिन्यांपूर्वीच राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आपणास दिलेला शब्द पाळला असे भावना व्यक्त करीत वडकुते यांनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत राज्यसभेत चांगली कामगिरी बजावतेवेळी राज्यात ठिकठिकाणी विविध विषयांच्या अनुषंगाने मोठे दौरे केले. एक उत्तम संघटक म्हणून ते सर्व दूर परिचित होते. धनगर समाजात एक प्रभावी नेता म्हणून त्यांची ख्याती होती. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


