परभणी, (प्रतिनिधी) : ‘सेवा संकल्प अभियान’, आयसीडीएस डे, पोषण माहच्या निमित्ताने पाथरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे आज विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयातील सुमारे २५० किशोरवयीन मुलींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी किशोरवयीन मुलींचा संतुलित आहार, पोषण, बालविवाह प्रतिबंध आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरवयात शरीराची वाढ व विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी सकस व पौष्टिक आहाराचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. नंदाताई गायकवाड, एनजीओ, पाथरी यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
पर्यवेक्षिका धनासुरे मॅडम यांनी वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
***


