सेलू तालुक्यात दोन दिवशीय विशेष नोंदणी शिबीर। दावे-हरकती सादर करण्याची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत
परभणी, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत दावे व हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदारांना दावे व हरकती 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत करता येणार आहेत. त्यापूर्वी येत्या शनिवार (दि.10) व रविवार (दि.11) रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रांवर जावून नावनोंदणी करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळावी, यासाठी 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघातील सेलू तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर दि. 10 व 11 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्राचे बूथ लेव्हल ऑफिसर उपस्थित राहून नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.
यापूर्वी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात आली होती. भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने पात्र नागरिकांना पुन्हा नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक मानून 18 वर्षे पूर्ण झाले आहे आणि अद्याप मतदार म्हणून नाव नोंदविले गेलेले नाही, अशा सर्व युवक-युवतींनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेणे, नावातील दुरुस्ती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी पात्र नागरिकांनी संबंधित मतदान केंद्रावरील विशेष शिबिरास भेट देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
*-*-*-*-*


