परभणी ( प्रतिनिधी) वाढदिवस म्हटलं की राजकीय नेत्यांच्या शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती आणि विविध कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, या पारंपरिक पद्धतीला छेद देत आ.डॉ.राहुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजुरांना मदतीचा हात देण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खर्च सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे आवाहन केले आहे.
आ.डॉ.राहुल पाटील यांचा येत्या १४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. परंतु, सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, दुष्काळग्रस्त बळीराजाच्या डोळ्यात पाणी असताना, वाढदिवसाचा उत्सव साजरा करण माझ्या मनाला पटत नाही, माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंग लावू नका. हारतुरे, पुष्पगुच्छ याच्यावर पैसे खर्च करण्याऐवजी केवळ समाज माध्यमातून मला शुभेच्छा द्या. शेतकरी हा समाजाचा अन्नदाता आहे. त्याच्यावर संकट आले असताना त्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेले संकट हे केवळ शेतकऱ्यांचे नसून आपल्या सर्वांचे संकट आहे, उत्सव नंतरही होईल; आधी माझ्या शेतकरी बांधवांचे अश्रू पुसणं गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे यंदा वाढदिवसाचा उत्सव न करता आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे त्यांनी सांगितले.


