परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
पाणी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी घरातील पाणी भरून झाल्यानंतर नळ त्वरित बंद करावेत. नळ सुरू राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करू नये. स्वच्छतागृहांमध्ये अनावश्यकपणे जास्त पाणी वापरणे आणि इतर कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय करणे टाळावे.
महानगरपालिकेने नागरिकांना पाणी भरल्यानंतर नळ बंद करणे, नळातून पाणी गळत असल्यास त्वरित दुरुस्ती करून घेणे, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी न करणे, स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक तेवढेच पाणी वापरणे आणि पाणी बचतीबाबत कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पाण्याचा अपव्यय करणाऱ्या तसेच महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबतच्या लागू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिला आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीला प्राधान्य देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, आज केलेली पाण्याची बचत भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पाणी वाचवा, पाणी जपून वापरा आणि परभणी शहराच्या पाणी बचत मोहिमेत सहभागी व्हा! असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख बेग मिर्झा, हेमंत दापकेकर ,प्रवीण हटकर ,बालाजी सोनुले
यांनी केले आहे


