परभणी,(प्रतिनिधी) : समाजासमोर प्रत्येक काळात विविध संकटे आणि आव्हाने उभी राहत असतात. मात्र, त्यांवर मात करण्याची शक्ती समाजातच असते. ही शक्ती जागृत करणे, समाजाला संघटित करणे आणि राष्ट्रहितासाठी सज्ज करणे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह आलोक कुमार यांनी केले.

परभणी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शनिवार 24 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील प्रांगणात आयोजित विजयादशमी उत्सवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बियाणे अॅग्रो इन्डस्ट्रीजचे उद्योजक अविनाश बियाणी, संघाचे विभाग संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, जिल्हा संघचालक मुकुंद चौधरी, शहरसंघचालक माऊली शिंदे हे व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी आलोक कुमार यांनी समाजापुढील आव्हाने, सामाजिक संघटनशक्ती आणि राष्ट्रहित या विषयांवर आपले मत व्यक्त केले. समाजातील दुर्गुणांच्या विरोधात लढण्याची शक्ती समाजात निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कारण सामाजिक, धार्मिक किंवा अन्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दुर्गुण निर्माण झाले आहेत, पसरत आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील या दुर्गुणांच्या विरोधात समाजात लढण्याची शक्ती निर्माण करणे हे संघाचे प्रामुख्याने कार्य आहे, असे ते म्हणाले. समाजातील प्रत्येक घटकाने स्वयंस्फूर्तीने संघटित व्हावे, संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जावे आणि राष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहनही केले.

समाजात सामूहिक शक्ती निर्माण झाल्यास कोणत्याही संकटाचा सामना करता येतो. त्यासाठी सामाजिक एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीची भावना महत्त्वाची आहे, असेही नमूद केले. समाजात मोठ्या प्रमाणावर निश्चितच जनजागरण आहे. समाजानेच धार्मिक पुनर्जागरणाचे काम मोठ्या प्रमाणावर पुढे नेले आहे. त्याद्वारे विश्वासही निर्माण केला आहे. धार्मिक असो कि अन्य क्षेत्रातील जनजागरणाचे काम हे निरंतर राहिले पाहिजे, त्यासाठी संघटन कार्य भक्कम झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
आज देश विशिष्ट स्थितीत आहे. विशेषतः अलिकडील काही वर्षात कुपोषणासह अन्य प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. जगात देशाचा सन्मान वाढला आहे. देशात सनातन हिंदु धर्माचे पुनर्जीवन झाले आहे, असे मत व्यक्त करतेवेळी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भावीकांची अलोट गर्दी, योगासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती, धार्मिक पुस्तकांचा मोठ्या प्रमाणावर वाढलेला खप, मंदिरांचे पुनर्जीवन, उत्सवांमधून उत्साह वाढला आहे. हे सारे चांगल्या प्रयत्नांचे निश्चितच यश आहे. परंतु, याबरोबर देशाविषयीची इर्षा आणि द्वेषही वाढत आहे. काही शक्तींच्या दृष्टीने ते विषय पोटदुखीचे ठरले आहेत. समृध्दी मजबुती या शक्ती पाहु इच्छित नाही. त्यामुळे या सर्व शक्ती एकजुटीने पैसा अन् नवनवीन चेहरे समोर करीत संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पध्दतीने रान उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी श्रध्देवर कशी मात करता येईल, लोक परंपरांवर कसे घाव घालता येतील, सर्वदूर देशाची प्रतिमा कशी खराब होईल, आंदोलनांच्या माध्यमातून अस्थैर्य कसे वाढेल या दृष्टीने राष्ट्रविरोधी ताकदी वेगवेगळ्या चेहर्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करु लागले आहेत, त्यांचे हे प्रयत्न प्रत्येकाने, समाजाने ओळखणे गरजेचे आहे, असे मत आलोक कुमार यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानाने प्रत्येकाला अधिकार बहाल केला आहे. परंतु, अधिकाराविषयीच मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. त्या तुलनेत संविधानाने प्रत्येकाकडून व्यक्त केलेल्या कर्तव्याकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे. आंदोलनांमधुन अधिकाराच्याच मुद्याचा प्रोपोगेंडा केला जात आहे. कर्तव्याकडे हेतुतः दुर्लक्ष केले जात आहे. परंतु, संघाने प्रत्येकात कर्तव्याविषयी बोध निर्माण व्हावा, समर्पणाचा भाव निर्माण व्हावा या दृष्टीने निरंतर प्रयत्न केले आहेत. समाजात संयम रहावा, समरसता आणि सद्भावना कायम रहावी, या दृष्टीनेही प्रयत्न होत आहेत.
समाजातील सुप्त शक्ती जागृत करून राष्ट्रहितासाठी कार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समर्थ समाज, सजग नागरिक आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असा संदेश या विजयादशमी उत्सवातून देण्यात आला.
यावेळी नगर कार्यवाह अजय हमदापुरकर यांनी प्रस्तावनेतून उत्सवामागील भूमिका विशद केली. रुपेश यादव यांनी वैयक्तिक तर प्रकाश कुलकर्णी यांनी सामुहीक पद्य म्हटले. अशोक गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले तर अनुप शुक्ला यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरीक, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


