परभणी,(प्रतिनिधी) : पहिली उचल 4250 2रू करण्याची मागणी करत पाथरी येथील रेणुका शुगर कारखान्याविरोधात ऊस उत्पादक शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. कारखाना व्यवस्थापन चर्चेसाठी येत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उतरून गाळप बंद पाडले.
ऊस उत्पादक शेतकर्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून चर्चेसाठी पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उतरून गाळप प्रक्रिया बंद केली. या आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. जोपर्यंत उसाची पहिली उचल प्रतिटन 4,250 रुपये जाहीर केली जात नाही, तोपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी घेतला आहे. दराबाबत निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी आणि अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ऊस दराच्या मागणीवरून निर्माण झालेल्या या आंदोलनामुळे रेणुका शुगर कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला असून, आता कारखाना व्यवस्थापन काय भूमिका घेते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.


