परभणी (प्रतिनिधी) दिवाळीच्या सणासुदीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अस्वच्छ वातावरणात अन्न उत्पादन करणाऱ्या परभणीतील एका मोठ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत मोठी कारवाई केली. परभणी येथील एमआयडीसी (MIDC) क्षेत्रातील प्लॉट नंबर सी-१५ आणि सी-१८ वर असलेल्या ‘मे. मोती नमकीन प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल ६३ लाख १४ हजार रुपये किमतीचा २२,५५० किलो वजनाचा संशयास्पद मिक्स शेवचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) वैभव एम. ठोंबरे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ही धडक तपासणी मोहीम सुरू केली.. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम २६ आणि २७ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा साठा जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर अन्न व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कारवाईचा आणि जप्त करण्यात आलेल्या मालाचा सविस्तर तांत्रिक तपशील खालीलप्रमाणे आहे: जप्त करण्यात आलेल्या मालात मिक्स शेव/फरसाणाचा २२,५५० किलो साठा अंदाजे किंमत रुपये 63 लाख 14हजार एवढी आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ऑनलाइन जनरेट केलेल्या अधिकृत तपासणी अहवालानुसार (Report Id: 1322570), या कारखान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आढळला आहे. अन्न सुरक्षा मानकांच्या मूल्यमापनात या कारखान्याला ८८ गुणांपैकी केवळ ३४ गुण मिळाले असून, कारखाना ३९% गुणांसह थेट “नॉन-कॉम्प्लायन्स” (अपात्र/नियमबाह्य) श्रेणीत वर्गीकृत करण्यात आला आहे.
अहवालात नोंदवण्यात आलेल्या गंभीर त्रुटी आणि धोके खालीलप्रमाणे आहेत:
• वापरलेल्या तेलाची संदिग्धता व धोका: सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी तळल्या जाणाऱ्या तेलाच्या दर्जाची (Quality Control) कोणतीही नोंद कारखान्यात नव्हती. वारंवार वापरल्या जाणाऱ्या तेलात ‘टोटल पोलर कंपाउंड्स’ (TPC) वाढून ते विषारी बनण्याचा आणि जनआरोग्याला थेट बाधा पोहोचवण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. तसेच फरसाणसाठी वापरले जाणारे मसाले उघडे व संशयास्पद स्थितीत आढळले.
• कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट व कीटकांचा प्रादुर्भाव: कारखान्यातील सांडपाण्याच्या निचरा प्रणालीला (Drain System) उंदीर-घुशी किंवा कीटक रोखणारे ट्रॅप्स (Rodent Traps) बसवलेले नव्हते. तसेच कारखान्यातील कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या मानकांनुसार केली जात नव्हती. फरसाणचा साठा आणि कचरा जमिनीवर अस्ताव्यस्त विखुरलेला होता.
• रासायनिक दूषितीकरणाचा धोका: कारखान्यात वापरली जाणारी जंतुनाशके आणि स्वच्छता करणारी घातक रसायने (Cleaning Chemicals) थेट खाद्यपदार्थांच्या शेजारीच साठवून ठेवल्याचे आढळून आले. यामुळे अन्नात रासायनिक क्रॉस-कंटामिनेशन (Cross-contamination) होण्याचा मोठा धोका होता.
• कामगारांची अस्वच्छता: प्रत्यक्ष अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या डोक्यावर कॅप्स, हातामध्ये ग्लव्हज किंवा ऍप्रन नव्हते. कामगारांची नखे आणि दाढी वाढलेली होती. संपूर्ण स्टोअर रूममध्ये जळमटे (Cobwebs) आणि धुळीचे साम्राज्य पसरले होते.
• दप्तरी नोंदींमधील सावळागोंधळ: कारखान्यात कच्च्या मालाच्या खरेदीची कोणतीही अधिकृत बिले, बॅच नंबर किंवा पुरवठादारांच्या नोंदी नव्हत्या, ज्यामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्यास मूळ स्त्रोताचा माग काढणे (Back Tracing) अशक्य होते. माल फिरवण्याची FIFO / FEFO पद्धत पाळली जात नव्हती, तसेच ग्राहकांसाठी कोणतीही तक्रार निवारण यंत्रणा (Customer Complaint Redressal System) अस्तित्वात नव्हती..
अन्न सुरक्षा विभागाने साक्षीदार यांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा करून सदर २२,५५० किलो मिक्स शेवचा साठा कारखान्याचे संचालक यांच्या ताब्यात सीलबंद करून दिला आहे. साठ्याला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हलवण्यास किंवा नष्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या शेवचे आणि खाद्यतेलाचे अधिकृत नमुने प्रयोगशाळेत (Food Analysis Lab) तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त होताच संबंधित अन्न व्यवसाय चालकाविरुद्ध न्यायालयात कडक फौजदारी खटला दाखल केला जाणार आहे.
अन्न सुरक्षा प्रशासनाचा जाहीर इशारा:
“दिवाळीच्या काळात मिठाई, फरसाण आणि खाद्यतेलाची मागणी वाढते. याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या, अस्वच्छतेत अन्न बनवणाऱ्या आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनेची गय केली जाणार नाही असे निर्देश श्री श्रीकांत करकळे सह आयुक्त यांनी दिले आहे..


