सेलू (प्रतिनिधी) आई महोत्सवानिमित्त मंठा देवी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील तब्बल 1200 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंठा देवीचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दर्शन सोहळ्याला माता-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमातून महिलांना धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
**दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि पैशाचा काटकसरीने वापर करा – डॉ. संजय रोडगे**
याप्रसंगी उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि पैशाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अशा काळात प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल.
तसेच, सध्याच्या परिस्थितीत विनाकारण खर्च करणे टाळावे, पैशाचा अपव्यय करू नये आणि अनावश्यक कारणांसाठी प्रवास करणे किंवा बाहेर जाणे शक्यतो टाळावे, असेही त्यांनी सांगितले. आजच्या काळात केलेली काटकसर भविष्यात उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीत कुटुंबाच्या उपयोगी पडू शकते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने पाणी, पैसा आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा विचारपूर्वक वापर करून आगामी काळासाठी आर्थिक व सामाजिक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी माता-भगिनींना केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. गणेश काटकर, ॲड. दत्ताराव कदम, संदीप बोकण व श्री. भागवत दळवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. गणेश काटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. दत्ताराव कदम, माऊली ताठे, पंचायत समिती सदस्य श्री. प्रभाकर गजमल, सरपंच शिवहरी शेवाळे, भागवत दळवे, प्रियंका ताई बोंबले, निर्मलाताई लिपणे, कैलासराव पवार, अश्विनी पवार, संदीप बोकन, सिद्धेश्वर लिपणे, राजाभाऊ लिपणे, भागवत लिपणे, बाळासाहेब लिपणे, सर्जेराव मोगरे, रंगनाथ लिपणे, उद्धव लिपणे, प्रकाश गजमल, नामदेव गायकवाड, भानुदास गायकवाड, उत्तम हिवाळे, बाळासाहेब गायकवाड, बाजीराव घोडके, विठ्ठल जाधव, सुदाम घोडके, गणेश सरोदे, भागवत घोडके, अनंता घोडके, नारायण घोडके, सविता घोडके, दौलताप्पा मोगरे, मुंजाभाऊ चौरे, बाळासाहेब गटकळ, आसाराम माने, भागवत गटकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आई महोत्सवानिमित्त आयोजित या दर्शन सोहळ्याला घोडके पिंपरी, सिद्धनाथ बोरगाव, गोहेगाव, शिंदे टाकळी, मालेटाकळी, लाडनांद्रा व डासाळा येथील मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा माता-भगिनींच्या श्रद्धेचा आणि एकजुटीचा प्रत्यय देणारा ठरला. धार्मिक उपक्रमासोबतच सामाजिक भान जपत पाणी बचत, आर्थिक काटकसर आणि भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.


