परभणी,(प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपाययोजना केल्या असून, दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा करण्याच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी स्वागत केले आहे.
या निर्णयाबद्दल त्यांनी शेतकर्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राज्यातील 305 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्याचा उल्लेख करत भुमरे यांनी पाणी, पीक आणि चारा नियोजनासह शेतकर्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकर्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याचे भुमरे यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासारख्या उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा पिकांचे नियोजन आणि शेतकर्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जात असल्याचे सांगून, या योजनांमुळे शेतकर्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचा दावा भुमरे यांनी केला. तसेच राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचार्यांच्या कुटुंबांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.
कर्नाटक सरकारच्या मदतीशी तुलना…
महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली असताना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शेतकर्यांसाठी अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्याचा दावा भुमरे यांनी केला. महाराष्ट्रातील मदत कर्नाटकच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही राज्यांतील मदतीची तुलना केली. पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि कृषी पंपांच्या वीजबिलासंदर्भातील सवलती अशा विविध योजनांचा उल्लेख करत दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भुमरे यांनी सांगितले. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करण्याऐवजी सर्वांनी एकत्रितपणे शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


