परभणी (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), परभणी अंतर्गत उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र, ताडकळस यांच्या मार्गदर्शनाखाली नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, शिरकळस यांच्या वतीने उपप्रकल्प (सब प्रोजक्ट )धान्य संकलन व विक्री केंद्राचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शिरकळस येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती जया नेमाने उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लेखा अधिकारी श्री. धनंजय कुलकर्णी, जिल्हा उपजीविका सल्लागार श्री. शरद कटारे, उत्कर्ष CMRC च्या अध्यक्षा श्रीमती शोभा राऊत, व्यवस्थापक श्रीमती गंगासागर भराड तसेच सरपंच मीरा माणिकराव भोसले यांची उपस्थिती होती. यावेळी गावातील बचत गटांच्या महिला तसेच महिलांचे कुटुंबीय आणि शेतकरी पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगासागर भराड यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. शरद कटारे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिला बचत गटांचे संघटन, आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता विकास आणि शेतीमालाच्या संकलन व विक्री व्यवस्थेचे महत्त्व विशद केले.
ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे, शेतमाल व धान्य संकलनासाठी संघटित व्यवस्था निर्माण करणे आणि महिलांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. धान्य संकलन व विक्री केंद्रामुळे महिला बचत गटांना व्यवसायाची नवी दिशा मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना भोसले, रोहिणी भोसले, प्राजक्ता घटमाळ, ज्योती चौरे तसेच भाग्यलक्ष्मी महिला बचत गटातील सर्व महिलांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मण भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांचे संघटन, आर्थिक स्वावलंबन आणि ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम शिरकळस परिसरातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*-*-*-*-*-*


