परभणी (प्रतिनिधी) गेल्या पाच दशकांत अनुभवला नसेल अशा भीषण दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावर दाटले असताना, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारने पाणी, पीक आणि चारा नियोजनाबरोबरच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील साडेतीन लाख कुटुंबांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होऊन बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे, अशा शब्दांत श्री. शिवाजी भरोसे यांनी समाधान व्यक्त केले.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त ताकीद दिली आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी पुरेसा चारा मिळावा, यासाठी ठोस उपाययोजना करून दुष्काळाचा सामना करण्याची तयारी फडणवीस सरकारने केली आहे. दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून, जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याचा निर्णय घेऊन जनावरांच्या संगोपनासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सरकारला साथ द्यावी, असे आवाहन श्री. भरोसे यांनी केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती ही नैसर्गिक आपत्ती असून, तिचा सामना करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, अशा गंभीर प्रश्नावर विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याची खंतही श्री. शिवाजी भरोसे यांनी व्यक्त केली.
राज्यात साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना वीजपुरवठ्याबाबत दिलासा देणाऱ्या उपाययोजना, कर्जवसुलीच्या तगाद्यातून शेतकऱ्यांना दिलासा, पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी अशा विविध निर्णयांमधून सरकारने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. याशिवाय राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्याचा निर्णय घेऊन सरकारने सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक बारा हजार रुपयांचा सन्मान निधी मिळत असल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. यासाठी राज्याच्या तिजोरीतून सहा हजार कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे नमूद करत, बळीराजासाठी संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करणाऱ्या महाराष्ट्रातील फडणवीस सरकारच्या योजनांचे अनुकरण काँग्रेसशासित राज्यांनीही करावे, असे आवाहन श्री. भरोसे यांनी केले.
*कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांना केवळ अडीच हजारांची मदत*
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीची घोषणा केली असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मात्र दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केवळ अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्याकडे श्री. शिवाजी भरोसे यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत कर्नाटकाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगत, कर्नाटक सरकार केंद्राकडून मदतीची प्रतीक्षा करत असल्याने तेथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत वेळेवर मिळेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील राज्याचा सहभाग, कृषी पंपांच्या वीजबिलाबाबतच्या सवलती आणि दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य अशा विविध योजनांच्या माध्यमातून फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे. विरोधकांनी राजकारण न करता जनहिताला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील पिढ्यांना दुष्काळाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पाला बळ द्यावे, असे आवाहन भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी केले.


