परभणी, (प्रतिनिधी ) : नवरात्रोत्सव, दुर्गादेवी आगमन-विसर्जन मिरवणुका, दसरा तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परभणी पोलिस प्रशासनाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार दि. 11 ते 21 ऑक्टोबर 2026 दरम्यान पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी परभणी जिल्ह्यासाठी विविध आदेश जारी केले आहेत.
यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने होणार असून २० ऑक्टोबर रोजी दसरा तर २१ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी विसर्जन होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, सभा व इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व विविध संघटनांकडून प्रसिद्धी किंवा वर्चस्वासाठी कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक सलोखा व शांतता कायम राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ अन्वये संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीत आवश्यक त्या सूचना व आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार रस्त्यावरील मिरवणुका, त्यातील नागरिकांकडून केली जाणारी वर्तणूक, मिरवणुकीचा मार्ग व वेळेबाबत पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळांच्या परिसरात किंवा रस्त्यांवर गर्दी अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. विविध कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याचे आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांनी पालन करणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सव व दुर्गादेवी आगमन-विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये डॉल्बी साऊंडची टॉप, मिड, बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच अशा साऊंड सिस्टिमसाठी बदल केलेली वाहने यांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश दि.११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री बारा वाजेपासून ते २१ ऑक्टोबर २०२६ रोजी 11:59 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या कालावधीत पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींचे उल्लंघन होऊ शकते. तसेच ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये किंवा विविध घटकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव व दसरा काळात जिल्ह्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३४ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हे आदेश ११ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दोन्ही दिवस धरून संपूर्ण परभणी जिल्ह्यात लागू राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*-*-*-*-*


