परभणी, (प्रतिनिधी): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी डिजिटल हयात प्रमाणपत्र तातडीने सादर करावे. लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास भविष्यात संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान शासन स्तरावरून बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. या योजनांमधील केंद्र पुरस्कृत लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर करण्यासाठी शासनाने ‘बेनिफिशरी सत्यापन ॲप’ विकसित केले आहे.
या ॲपच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण व फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करून डिजिटल हयात प्रमाणपत्र ऑनलाइन तयार करता येते. तयार झालेले प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या एनएसएपी पोर्टलवर थेट अद्ययावत होणार असल्याने लाभार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुलभ, सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. वारंवार नोटीस तसेच आवाहन करूनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप सादर केलेले नाही. हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान शासन स्तरावरून बंद होऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आपले अनुदान सुरू ठेवावे.
मोबाईलवरून असे तयार करा हयात प्रमाणपत्र
लाभार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘आधार फेस आरडी ॲप’ आणि ‘बेनिफिशरी सत्यपन ॲप-2’ हे दोन ॲप डाउनलोड करावेत. त्यानंतर ‘बेनिफिशरी सत्यपन ॲप’ सुरू करून भाषा निवडावी व डिव्हाईस रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणीसाठी आधार क्रमांकासह मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलवर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून प्रमाणीकरण करावे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी चेहऱ्याची ओळख पडताळणी करताना ॲपच्या सूचनांनुसार डोळ्यांची हालचाल करून सेल्फी द्यावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेनिफिशरी व्हेरीफिकेशन सर्टीफिकेट अर्थात डिजिटल हयात प्रमाणपत्र ऑनलाइन प्राप्त होईल.
लाभार्थी ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरून पूर्ण करू शकतात. तसेच सहकारी किंवा कुटुंबीयांच्या मदतीने, महा ई-सेवा केंद्र, तलाठी अथवा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाच्या सहाय्याने डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. केंद्र पुरस्कृत वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांनी डिजिटल हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ अखंडित सुरू ठेवावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*


