परभणी, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या युवक-युवतींना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सोमवार, (दि.23) रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), परभणी येथे होणार आहे.
मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, परभणी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात विविध आस्थापनांमार्फत शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10 हजार ते 16 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळणार आहे.
या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे यासह राज्यातील इतर ठिकाणच्या विविध आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना विविध आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासोबतच कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवार, अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी तसेच इतर पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह या भरती मेळाव्यास उपस्थित राहून उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास आडे यांनी केले आहे.
*-*-*-*-*-


