जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही– पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, परभणी जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह २०२६ च्या अनुषंगाने कळमनुरी येथील प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्यावतीने आज परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रमेश भडके, वक्ते गजानन काळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) आर. एल. भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी जी. बी. बैस, सहाय्यक लेखा अधिकारी परे तसेच परभणी येथील मुला-मुलींच्या वसतिगृहांचे गृहपाल व कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात आजचा दिवस आदिवासी समाजाच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना लाभ दिला जात आहे.
दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी, शिक्षणाच्या सुविधा आणि इतर मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्यात येणार असून पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रगतीसाठी आदिवासी बांधवांनी आपल्या स्वप्नांसह पुढे यावे. ती स्वप्ने पूर्ण करण्याकरीता शासन कोणतीही कमतरता भासू देणार नाही नाही. आदिवासी भागातील विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीत शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
जनजातीय गौरव दिन व सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजनांची माहिती व लाभ पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी जनजातीय गौरव दिन व सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार असल्याचे सांगितले. आरोग्य, शिक्षण, बचत गट, विविध शासकीय दाखले आणि इतर योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून या कामात सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक करताना वक्ते गजानन काळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड येथे जन्मलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध तसेच आदिवासींच्या जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांनी केलेला ‘उलगुलान’ हा उठाव आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. आदिवासी समाजाचे उज्ज्वल भविष्य, स्वाभिमान आणि हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा जागर करत समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
-*-*-*-*


