परभणी, (प्रतिनिधी) : समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या अडचणी, तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना न्याय मिळवून देणे तसेच आवश्यक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महिला लोकशाही दिन सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, तर तालुकास्तरावर चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार असतात.
जिल्ह्यातील महिलांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी विहित नमुन्यात सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांनी केले आहे.
***


