परभणी (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व स्थिनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परभणी हद्दीतील घरफोड्या उघड करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत बुधवारी(दि. ४)गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पूर्णा येथील उड्डाणपुलाजवळील मोकळ्या जागेत, पालाजवळ दोन संशयित इसम थांबले आहेत. माहिती मिळताच पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पूर्णा पोलीस ठाणे येथील गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांत दाखल पूर्णा गु.र.नं. १९७/२०२६ कलम ३३२(४), ३९५(अ) भा.न्या.सं. गुन्ह्यातील आरोपींनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. यावरून आरोपी चरण किसना उर्फ बशा शिंदे उर्फ पवार(वय २१), रा. आदिलाबाद, राज्य तेलंगणा, एक विधीसंघर्षित बालक, (वय १७) यांना ताब्यात घेण्यात आले. तर गुन्ह्यातील रघु उर्फ रड्या शास्त्री भोसले, रा. पूर्णा, कटप्पा उर्फ शीला हनुमंत भोसले, रा. वरणातांडा, बोरी, ता. जिंतूर हे फरार झीले आहेत. या कारवाईकून पोलिसांनी एकूण २ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी स्थिनिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार, श्रेणी पोलिस उपनिरिक्षक मधुकर चट्टे, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, केशव लटपटे, लक्ष्मण कांगणे, रंगनाथ दुधाटे, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे, विलास बहुरे यांनी मिळून केली. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
०००


