सेलू,(प्रतिनिधी) : आधी समाज असतो आणि नंतर शासन. त्यामुळे समाजाने भाषेकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. भाषा ही समाजाचे अपत्य असून, ती माणसाच्या बुद्धीचा आविष्कार आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन आणि समृद्धी ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजर्या होणार्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सोमवार 26 ऑक्टोबर रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात शब्दसह्याद्री प्रतिष्ठान आणि अक्षर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अक्षर व्याख्यानमाला श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना डॉ. कुलकर्णी यांनी ‘मराठी भाषेचे संवर्धन : शासन, समाज आणि नव्या पिढीची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, सेलूचे अध्यक्ष सर्जेराव लहाने होते, तर व्यासपीठावर शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणीचे सचिव तथा कवी डॉ. केशव खटींग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. किरण कुलकर्णी, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, डॉ. एस. एम. लोया, डॉ. अरविंद बोराडे, रामराव बोबडे आणि अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद ठाकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. बोलीभाषा ही मराठी भाषेची मूळं आहेत. त्यामुळे बोलीभाषांच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. छोट्या बोलीभाषांचा अभ्यास करणे म्हणजेच अभिजात मराठी भाषेचे संवर्धन करणे होय. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्नांबरोबरच समाज आणि नव्या पिढीची भूमिकाही महत्त्वाची आहे. नव्या पिढीने ऑडिओ, व्हिडिओ आणि रिल्सच्या माध्यमातून मराठीतून संवाद वाढवावा. मराठीतील बोलीभाषा आणि अस्सल शब्द डिजिटल माध्यमांवर उपलब्ध व्हावेत. असे झाल्यास मराठी भाषेचे सौंदर्य आणि समृद्धी जगभर पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सहसचिव डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले, तर उपाध्यक्ष डॉ. सतीश मगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. अशोक पाठक, रमेश नखाते, संतोष ताल्डे, पांडुरंग पाटणकर, एकनाथ जाधव, डॉ. भास्कर शिंदे आणि सच्चिदानंद डाखोरे यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानाला शिक्षक, प्राध्यापक, युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि लेखकांचा सन्मान…
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, डॉ. पवन चांडक, मनिषा आष्टीकर, विजय ढाकणे, माधव गव्हाणे, शिवदास पोटे, डॉ. सखाराम कदम आणि संध्या फुलपगार या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा तसेच पुस्तक प्रकाशित झालेल्या लेखकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


