सेलू,(प्रतिनिधी) : जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनच्या वतीने सेलू तालुका क्रीडा संकुल येथे 26 ऑक्टोबर रोजी ज्युनियर गटातील जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 115 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मुलांच्या सहा, तर मुलींच्या तीन संघांनी आपले क्रीडाकौशल्य दाखविले. मुलांच्या गटात सातेफळ संघाने प्रथम, कावलगाव संघाने द्वितीय, तर पालम आणि सेलू संघांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात सातेफळ संघाने प्रथम, पालम संघाने द्वितीय, तर पूर्णा संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
या निवड चाचणी स्पर्धेतून रायगड येथे होणार्या राज्यस्तरीय ज्युनियर आट्यापाट्या स्पर्धेसाठी मुलांचे आणि मुलींचे संघ लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. स्पर्धेची सुरुवात आट्यापाट्या क्रीडांगणावर गणेश माळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. प्रमुख पाहुणे माधव लोकुलवार यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी पंच म्हणून सिकंदर सय्यद, गोविंद शिंदे, श्रीकांत, विनायक आणि गंगाधर पिसाळ यांनी काम पाहिले. परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव एम. एम. क्षीरसागर यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. सर्वांच्या सहकार्याने ही निवड चाचणी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली


