परभणी,(प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री रोखण्याकरीता प्रशासनाने हॉटेल्स, स्वीटमार्ट, बेकरी व अन्य विक्रेत्यांकडील अन्नपदार्थांची विशेष मोहिम राबवून तपासणी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या एका शिष्टमंडळाने केली आहे.
सणासुदीत मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची विक्री होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरसुध्दा छोटे-मोठे हॉटेल्स, स्वीटमार्ट, बेकरी किंवा विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर मिठाई, खव्वा तसेच फरसाणसह अन्य खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री अपेक्षित आहे. परंतु, या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना या व्यवसायिकांकडून विक्रेत्यांकडून भेसळयुक्त व शिळा खव्वा, कृत्रिम पनीर, कृत्रिम रंग वापरलेली मिठाई, सातत्याने वापरलेले तेल व त्यातून तयार केलेले खाद्य पदार्थ, विक्री होऊ नयेत व त्यापासून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाने प्रत्येक तालुकास्थानी विशेष तपासणी मोहिम राबवावी, खाद्य पदार्थांचे नमूने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेस पाठवावेत, असे मत ग्राहक मंचाचे सोपानराव टाले, मधुकर मुळे, अब्दुल रहीम, भगवानराव करंजे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी व्यक्त केले.


