परभणी,(प्रतिनिधी) : गेल्या नव्वद वर्षांपासून कार्यरत राष्ट्रसेविका समिती भविष्यातही समाज जागरण आणि राष्ट्र परिर्वनाकरीता कटीबध्द आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत सहकार्यवाहिका सौ. अंजली बडवे यांनी व्यक्त केले.
येथील राष्ट्रसेविका समितीद्वारे विजयादशमी निमित्त गव्हाणे रस्त्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रा.डॉ. सौ. स्वाती देशमुख व जिल्हा कार्यवाहिका सौ. मनिषा देशमुख या व्यासपीठावर विराजमान होत्या.
यावेळी प्रांत सहकार्यवाहिका सौ. बडवे यांनी आपल्या भाषणातून ‘प्रभाव से परिवर्तन तक समिती के 90 साल’ या विषयावर भाष्य करतेवेळी समितीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समिती स्थापनेपासून आजपर्यंतच्या समिती कार्याचा आढावा घेतला. समितीच्या आद्य संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी केलेल्या कार्याचा आणि समितीच्या सेविकांनी दिलेल्या योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला. राष्ट्र सेविका समिती समाजामध्ये राष्ट्रभक्ती, समाज जागरण, संस्कार, समर्पण, सेवा या पध्दतीने काम करीत आहेत आणि यातूनच त्याचे चांगले परिणाम विशेषतः परिवर्तन मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे, असे नमूद करतेवेळी सौ. बडवे यांनी पुढच्या काळात सेविका म्हणून आपल्याला अजूनही समाज जागरण आणि राष्ट्र परिवर्तनाकरीता मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे, असे नमूद केले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सौ. देशमुख यांनी राष्ट्रसेविका समितीची कार्यपध्दती, अनुशान आणि राष्ट्रभक्ती याचे कौतूक केले. यावेळी जिल्हा बौध्दिक प्रमुख डॉ. मंजूषा चौधरी यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. तर सौ. विभा वसमतकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मनिषा देशमुख यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान, या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शस्त्रपूजन, देवी अष्टभूजा, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर, वंदनीय सरस्वतीताई आपटे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भगव्या ध्वजाचे रोहण करुन ध्वजाला प्रणाम आणि प्रार्थना म्हणण्यात आली.
शहराच्या मध्यवस्तीतून पथसंचलन…
राष्ट्रसेविका समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी शहरातील मध्यवस्तीतून सेविकांनी जोरदार पथसंचलन केले. गव्हाणे रस्ता, नारायणचाळ चौक, अष्टभूजा मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, लालपोतू कलेक्शन पासून कच्छी बाजार, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार मार्गे गांधीपार्कात या संचालनाचा समारोप करण्यात आला. पथसंचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरीकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. दुतर्फा नागरीकांनी पुष्पवृष्टी करीत या सेविकांचे स्वागत केले. या कार्यक्रमात व पथसंचालनात शेकडो सेविका सहभागी झाल्या होत्या.


