परभणी, (प्रतिनिधी) : राज्यात यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरवून संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षितता मिळवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
परभणी जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिकांच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्य शासनामार्फत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2026 आणि रब्बी 2026-27 या वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा उतरवावा. रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सात पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळ किंवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) 30 नोव्हेंबर, गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका आणि रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग 31 मार्च 2027पर्यंत विमा काढता येणार आहे. या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणे ऐच्छिक आहे. योजनेच्या नोंदणीसाठी PMFBY पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र, योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या अधिकृत पोर्टलवर स्वतः नोंदणी करावी किंवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप तसेच सामूहिक सेवा केंद्र यांच्या माध्यमातून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली असून, क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, काकडे बीझ, आयकॉन, ई-स्क्वेअर जवळ, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे – ४११०१६, (ई-मेल pmfby2026@uiic.co.in) या पत्त्यावर संपर्क साधता येणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

***


