परभणी, (प्रतिनिधी) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेश अर्जासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना नियमित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, परभणी जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात नियमित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम् योजनेसाठी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
*-*-*-*-*-


