परभणी, (प्रतिनिधी) : बालकांचे हक्क, अधिकार आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात ‘सुरक्षित बालपण अभियान’ राबविण्यात येत आहे. बालकांच्या रक्षणासाठी आशा यंत्रणा सदैव तत्पर आणि सज्ज असल्याचे प्रतिपादन बाल न्याय मंडळाचे सदस्य रवी पुराणिक यांनी केले.
या अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन, परभणी यांच्या वतीने जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय, परभणी तसेच जिल्हा परिषद शाळा, धर्मापुरी येथे बालहक्क व बालसंरक्षण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या परिवीक्षा अधिकारी मनीषा तांदळे, तालुका संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन व वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा, संकटसमयी मदतीसाठी तत्पर असणाऱ्या यंत्रणा, बालकांचे हक्क व अधिकार तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. बालकांच्या सुरक्षिततेमध्ये शिक्षकांची भूमिका आणि त्यांच्यावर असलेली महत्त्वाची जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘रोटी, खेल, पढाई, प्यार – हर बच्चे का है अधिकार’ अशा घोषणांद्वारे बालहक्क व बालसंरक्षणाचा संदेश दिला.
हा जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे आणि प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. एस. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
*-*-*-*-*


