परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणातून चार आवर्तने पाणी सोडण्याच्या आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या मागणीला यश आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित छत्रपती संभाजी नगर येथे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या कालवा सलागार समितीच्या बैठकीत आ. डॉ. पाटील यांच्या पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे परभणी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून रब्बी पेरणीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
परभणी जिल्ह्यात दुष्काळामुळे खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामातील पेरण्या देखील पाण्याअभावी थांबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित सोमवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आ. पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता समजावून सांगत जायकवाडी धरणातून तात्काळ पाणी सोडणे आवश्यक असल्याचे सांगितले.
जायकवाडीतून पाणी न सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून रब्बीच्या पेरण्या देखील खोळंबणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. या मागणीची तात्काळ दखल घेत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी जायकवाडी धरणातून पहिले आवर्तन सोडले जाईल असे सांगितले. त्यानंतर एका महिन्याच्या अंतराने दोन आवर्तने सोडण्यात येतील. त्यासोबतच उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांसह जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडले जाईल असे जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे पाणीटंचाईच्या झळांनी होळपणाºया शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी आ. पाटील यांनी जलसंपदा मंत्री विखे यांच्याकडे निवेदन देत मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात एकुण ४७ अभियंत्याची पदे आहेत. यातील ४५ पदे रिक्त आहेत. केवळ २ अभियंते कार्यरत असून त्यांच्यावरच संपूर्ण मराठवाड्याची मदार आहे. त्यामुळे जायकवाडीचे पाणी वितरण सुरळीतपणे करण्यात अडथळा निर्माण होत असून ही रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी यावेळी केली. या मागणीला विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले. या बैठकीनंतर आ. पाटील यांनी शेतकºयांनी काळजी करू नये. परभणी जिल्ह्याला जायकवाडी धरणातून पाणी मिळणार आहे. या पाण्याचा स्प्रिंकलरद्वारे जपून वापर करावा, जास्तीत जास्त चारा पिके घ्यावीत असे आवाहन केले आहे.
जायकवाडी कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी
जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाºया कालव्याचा परिसर २०८ किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. परंतू या कालव्यांचे अनेक वर्षांपासून अस्तरीकरण न झाल्याने जायकवाडीतून सोडण्यात येणाºया ४० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे जायकवाडीतील पाणी टेलच्या शेतकºयांपर्यंत पोहचत नाही. टेलच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहचण्यासाठी २०८ किलोमीटरच्या कालव्याचे अस्तरीकरण करावे. यामुळे सर्व शेतकºयांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी मदत होईल अशी मागणी आ. पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.


