परभणी, (प्रतिनिधी) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांची कर्जप्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. यासाठी जिल्हाधिकाऱ्यां समवेत बैठक घेऊन संबंधित बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, समाजातील लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी दिली.
परभणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. यावेळी महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, पत्रकार व समाज बांधव उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, काही लाभार्थ्यांना कर्जप्रकरणे मंजूर करून घेताना बँकांकडून विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना वेळेत कर्ज मिळावे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी महामंडळाकडून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
लाभार्थ्यांच्या प्रलंबित कर्जप्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून बँक अधिकाऱ्यांना कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात येतील. यामुळे पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली.
महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, कर्जप्रक्रियेतील अडथळे दूर करणे आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत १ लाख ८५ हजार १३६ लाभार्थ्यांची बँक कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. बँकांमार्फत एकूण १८ हजार ३२२ कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले असून, महामंडळमार्फत २ हजार १६३ कोटी रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. राज्यात एकूण १ लाख ७६ हजार ४५४ लाभार्थ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा सुरू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात मराठवाड्यात आतापर्यंत ५० हजार ५५१ लाभार्थ्यांची कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. बँकांमार्फत ४ हजार ९०९ कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले असून, महामंडळाने ४६१ कोटी रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांना केला आहे. विभागातील ४८ हजार ३५५ लाभार्थ्यांना महामंडळाकडून व्याज परतावा सुरू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४१४ लाभार्थ्यांची कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. बँकांमार्फत १७३ कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले आहे. महामंडळाने लाभार्थ्यांना आतापर्यंत २३.८९ कोटी रुपयांचा व्याज परतावा दिला असून, जिल्ह्यातील २ हजार २२७ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.
****


