परभणी, (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यात ‘सुरक्षित बचपण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांअंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण)आर. एम. सादराणी, यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी व हिंगोली जिल्हयातील ६५ पेक्षा अधिक शाळा/कॉलेज/वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांसाठी सदर अभियानांअंतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले.
या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच, बालकांचे स्वसंरक्षण, बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम, तसेच बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या विविध यंत्रणा व सेवा याबाबत विविध ठिकाणी वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच बालकांनी कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी न पडता प्रसंगी धैर्याने त्याचा प्रतिकार करावा, तसेच अडचणीच्या प्रसंगी पालक, शिक्षक व संबंधित यंत्रणांची मदत घ्यावी. तसेच, बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, बालकांचे हक्क व संरक्षण याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
तसेच या अभियानाअंतर्गत बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकांची सामुहिक जबाबदारी आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित, आनंदी व भयमुक्त बालपण मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रत्यत्न करणे आवश्यक आहे. तसेच बालकांना काही अडचण आल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८, महिला हेल्पलाईन १८१, पोलीस हेल्पलाईन ११२ व कायद्येविषयक काही अडचण असल्यास १५१०० या सर्व हेल्पलाईन क्रमांकाचा अडचण आल्यास उपयोग करावा, असे आवाहन सचिव (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) भूषण म. काळे, यांनी केले.
***


