जिल्ह्यात बालहक्कांच्या संरक्षणासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत ‘बाल हक्क सप्ताह; बालविवाह निर्मूलनासाठी विविध जनजागृती उपक्रम
परभणी,(प्रतिनिधी): ‘बालविवाहमुक्त परभणी जिल्ह्या’च्या निर्मितीसाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक व सामाजिक संस्थांसह नागरिकांनी बालविवाहमुक्त परभणी या अभियानात सक्रिय सामूहिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमी करून बालकांचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत ‘बाल हक्क सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध, बालहक्क संरक्षण आणि बालकांना सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार याबाबत जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सदस्य व नागरिकांनी https://stopchildmarriage.wcd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेऊन प्रतिज्ञा प्रमाणपत्र डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या चौथ्या सर्वेक्षणानुसार परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 48 टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात 4 जानेवारी 2003 पासून ‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियान राबविण्यात येत आहे. बालविवाहामुळे बालकांचे शिक्षण खंडित होणे, कुपोषण, आरोग्यविषयक समस्या, कौटुंबिक हिंसाचार, शोषण तसेच बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006ची प्रभावी अंमलबजावणी करून बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेने 5 ऑक्टोबर 2026 रोजी ठराव मंजूर करून दरवर्षी 27 नोव्हेंबर हा दिवस बालविवाह व सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यात 18 ते 27 नोव्हेंबरदरम्यान बाल हक्क सप्ताह राबविण्यात येत असून, 27 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सप्ताहादरम्यान शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, बचत गट आणि विविध समुदायांच्या सहभागातून बालहक्क, बालविवाह प्रतिबंध व बालसंरक्षणासंदर्भात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण, विकास आणि सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने ‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियानांतर्गत लघुचित्रफीत तयार केली आहे. ही लघुचित्रफीत 27 नोव्हेंबर 2026 रोजी एनआयसी परभणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करण्यात येणार आहे. यामुळे बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
सप्ताहांतर्गत विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल व छायाचित्रांसह 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, परभणी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले आहेत.
*-*-*-*-*


