परभणी, (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) २०२६ राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांसाठी गणना प्रपत्र (एन्युमरेशन फॉर्म – EF) उपलब्ध करून देणे तसेच गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्धारित कालमर्यादेत कामकाज पूर्ण करावे. तसेच मतदारांनीही विहित मुदतीचे पालन करून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार असून, गणना प्रपत्रे डाऊनलोड करण्याची प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. नोटीस टप्पा तसेच दावे व हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांची गणना प्रपत्रे ईसीआयनेट (ECINET) प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या मतदारांच्या याद्या परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्यामार्फत या मतदारांची गणना प्रपत्रे डाऊनलोड करून त्यांची मुद्रित प्रत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करणे तसेच त्याबाबतच्या नोंदी व्यवस्थित जतन करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. विशेषतः अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांच्या नोंदींच्या अनुषंगाने संबंधितांनी आपली माहिती तपासून घ्यावी. ज्या मतदारांना गणना प्रपत्र प्राप्त होईल, त्यांनी त्यातील माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक तपशील अचूक भरावेत आणि विहित मुदतीत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावेत. मतदार यादी अचूक, अद्ययावत व त्रुटीविरहित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये तसेच अपात्र नोंदींची नियमानुसार पडताळणी व्हावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
***


