परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार 17 नोव्हेंबर रोजी बी. रघुनाथ सभागृहात महापौर सय्यद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेल्या 62 विषयांपैकी 61 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर एका विषयावर अधिक माहिती घेऊन तो पुढील सभेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल सहा तास चाललेल्या या सभेत शहरातील विकासकामे, नागरी सुविधा, रस्ते, स्वच्छता आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर आणि नगरसचिव विकास रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत शहरातील विविध रस्ते आणि चौकांच्या नामकरणाचे ठराव मंजूर करण्यात आले. दुष्काळी रस्त्याचे नामकरण राजर्षी शाहू महाराज रस्ता, परभणी-जिंतूर रोडवरील नवीन बायपासजवळील चौकाचे शिवरत्न जीवा महाले चौक, तर परभणी-नांदखेडा रोडवरील बायपास पुलाला सद्गुरू श्री राम भरोसे महाराज संस्थान मार्ग असे नाव देण्याचा ठराव नगरसेवक भगवान वाघमारे आणि नगरसेविका शुभांगी पाष्टे यांनी मांडला. या ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच विनायकनगर येथील आजम चौक दर्गा रोड ते जुना पेडगाव रोड या दोन मुख्य रस्त्यांना जोडणार्या रस्त्याला माजी आमदार अब्दुल रहमान खान मार्ग असे नाव देण्याचा ठराव नगरसेवक नदीम इनामदार आणि नगरसेविका रुकसाना बेगम यांनी मांडला. तोही एकमताने मंजूर करण्यात आला. याशिवाय वसमत रोडवरील कारेगाव चौकाला संत तुकाराम चौक असे नाव देण्याची मागणी नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांनी केली.
महापालिका हद्दीतील घरांच्या घरपट्टीसंदर्भात अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नगरसेवक सुनील देशमुख यांनी उपस्थित केला. भगवान वाघमारे यांनी त्यास अनुमोदन दिले. चर्चेनंतर या विषयाला मंजुरी देण्यात आली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती व इतर संबंधित कामांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. या कामांसाठी महापालिकेचा 30 टक्के स्वहिस्सा उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर झाला. प्रत्येक कामासाठी साडेसात लाख रुपये खर्च अपेक्षित असून, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्वे क्रमांक 579/1 मधील शासकीय संपादित जमिनीवरील मालमत्ता क्रमांक 1147 संदर्भात विशेष सभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरील कारवाईचा अहवाल आगामी सभेत सादर करण्याची मागणी करण्यात आली. यावर आयुक्त नितीन नार्वेकर यांनी या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती दिली. त्यामुळे संबंधित विषय अधिक माहिती घेण्यासाठी पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आला.
या सभेला नगरसेवक रितेश जैन, अक्षय देशमुख, दिलीप ठाकूर, बबलू टाक, अद्वैत सांगळे, डॉ. केदार खटिंग, सुशीला थोरात, वैशाली दैठणकर, रहीस खान, सरफराज खान, मिलिंद घागरमाळे, शरफोद्दीन सिद्दीकी, गिरीजा शंकर आजगावकर, आकाश लहाने, विनोद कदम, अर्जुन सामाले, सभापती राजेश रणखांबे, संतोष गुजर, मिलिंद बामणीकर, श्याम खोवे आदी उपस्थित होते. तब्बल सहा तास चाललेल्या या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले. 62 पैकी 61 विषयांना मंजुरी मिळाल्याने सभेतील कामकाज महत्त्वपूर्ण ठरले.
वारकरी भवनासाठी जागा निश्चित करण्याची मागणी..
शहरात वारकरी भवन उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला. यापूर्वी वारकरी भवन उभारण्याचा ठराव मंजूर झाला असून आता जागा निश्चित करावी, अशी भूमिका गटनेते विजय जामकर यांनी मांडली. नगरसेविका अंबिका डहाळे आणि नगरसेवक सुनील देशमुख यांनी दिंडी मार्ग असलेल्या वसमत रोड किंवा गंगाखेड रोडवर जागा निश्चित करण्याची मागणी केली.
100 खाटांच्या आयुष हॉस्पिटलचा प्रस्ताव मंजूर…
महानगरपालिका हद्दीत 100 खाटांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्याचा ठराव स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांनी मांडला. महापालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा. यासाठी खासदार संजय जाधव पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देतील, अशी माहिती सभागृहात देण्यात आली. चर्चेनंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
नालीचे काम पूर्ण झाल्यानंतरच बिल अदा करण्याची मागणी….
पारदेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या नाली बांधकामाचा मुद्दा नगरसेवक व्यंकट डहाळे यांनी उपस्थित केला. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर आयुक्त नार्वेकर यांनी संबंधित ठेकेदाराला काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
नगरसेवकांची विविध विषयांवर चर्चा….
सभेत गटनेते विजय जामकर, काँग्रेस गटनेते गुलमीर खान, सभागृह नेते सय्यद समीर उर्फ माजलाला, गटनेते विश्वजीत बुधवंत, सागर गांगाळे, मीनाताई वरपूडकर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विविध विषयांवर चर्चा केली. ऐनवेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयांवरही सभागृहात चर्चा करून निर्णय घेण्यात आले.


