परभणी, (प्रतिनिधी): जनगणना २०२७ ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय मोहीम असून, तिचे काम अचूक, पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के प्रशिक्षण आणि जनगणनेबाबत व्यापक जनजागृती करून जनगणनेची प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले.
जनगणना संचालनालय, महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी जिल्हा, उपविभागीय, शहर तसेच चार्ज व अतिरिक्त चार्ज स्तरावरील जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहायक यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले आहे. आज प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, जीवराज डापकर तसेच जनगणना संचालनालयाचे उपनिदेशक सागर बागूल आणि सांख्यिकी अन्वेषक पवन गोडे हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित आहेत. जिल्हा, उपविभागीय, शहर, चार्ज व अतिरिक्त चार्ज स्तरावरील जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक, तांत्रिक सहायक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात गृहगणनेचे काम करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणातील १०० टक्के उपस्थिती महत्त्वाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून जनगणनेचे काम पारदर्शक व अचूक पद्धतीने पूर्ण करावे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटना आदींच्या माध्यमातून जनगणनेबाबत अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम निर्धारित मुदतीपूर्वी आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करून पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविकातून दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेची माहिती दिली. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्याने राज्यात नववा तर विभागात दुसरा क्रमांक मिळविला असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले. जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी संकलित करण्यापुरती मर्यादित नसून, देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीनिहाय ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार असून, त्याद्वारे नागरिकांची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन संकलित माहितीची पडताळणी करणार आहेत.
दरम्यान, जनगणना प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहितीही प्रशिक्षणातून देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी डॉ. राजकुमार राठोड, नायब तहसीलदार तथा मास्टर ट्रेनर, तहसील कार्यालय, परभणी, जनगणना कक्षाचे सहायक महसूल अधिकारी अलताफ मिया, तांत्रिक सहायक प्रियंका राठोड आणि सौरभ कदम यांनी सहकार्य केले.
जनगणनेचा दुसरा टप्पा हा व्यापक स्वरूपाचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रगणक, पर्यवेक्षक आणि जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि त्यांची जनगणना संबंधित यंत्रणा, तसेच परभणी महानगरपालिका येथील जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी सदर प्रशिक्षणास उपस्थित होते.
-*-*-*-*-*


