परभणी (प्रतिनिधी) : परभणी शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नागरिकांना १६ डिसेंबर २०२६ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत थकीत कराची वसुली करण्यासाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीची मूळ रक्कम एकरकमी भरल्यास विलंबशास्तीवर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.
यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी निश्चित केलेला कालावधी वाढविण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी घेतला आहे. त्यानुसार १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०२६ या कालावधीत थकीत कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना विलंबशास्तीच्या संपूर्ण रकमेतून सूट मिळणार आहे.
थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीधारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी एकरकमी भरावी, असे आवाहन महापौर सय्यद इकबाल उपमहापौर गणेश देशमुख आयुक्त नितीन नार्वेकर स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल सरोदे आदीं केले आहे


