परभणी (प्रतिनिधी) वाईट उद्देशाने हात व साडीचा पदर धरून ‘तू मला आवडतेस’, असे म्हणत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी परभणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस ६ महिने सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी २० मार्च २०२२ रोजी परभणी शहरातील नानलपेठ पोलिसांत गुन्हे रजिस्टर नंबर ८९/२०२२ भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४(अ), ४५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार ए. एन. मुरकुटे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. वर्मा यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात सरकारपक्षाच्या वतीने अभियोक्ता जीवन वडेर यांनी बाजू मांडली. वडेर यांनी खटल्यातील ४ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. गुरुवारी न्यायाधीश एम. एम. शर्मा यांनी या प्रकरणाचा निकाल सुनावला. या निकालात आरोपी दीपक बालासाहेब खुडे यास भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४(अ) अन्वये दोषी ठरवून ६ महिने सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
या खटल्यात सहाय्यक संचालक अनंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात सरकारी अभियोक्ता जीवन वडेर यांनी सरकारपक्षाच्या वतीने बाजू मांडली. तसेच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात कोर्टपैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, वंदना आदोडे, कोर्टपैरवी बी. बी. जवादे, पोलीस अंमलदार के. बी. मुंडे यांनी काम पाहिले.
०००


